
हिंदू युवकाच्या लिंचिंगवर शशी थरूर यांचे पहिले विधान
नवी दिल्ली, 20 डिसेंबर (हिं.स.) । बांगलादेशात हिंदू युवकाच्या लिंचिंगच्या घटनेवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत, असे थरूर यांनी म्हटले आहे.
बांगलादेशात शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या अशांततेदरम्यान एका हिंदू युवकाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) केलेल्या पोस्टमध्ये शरूर म्हणाले की, बांगलादेशभर पसरलेल्या जमावशाहीच्या वातावरणात ही अत्यंत असह्य आणि दुर्दैवी घटना आहे. या निर्दयी गुन्हेगारांच्या हातून एका निरपराध हिंदू युवकाचा मृत्यू झाल्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो. बांगलादेश सरकारने या घटनेचा केलेला निषेध स्वागतार्ह आहे, मात्र मी त्यांना विचारू इच्छितो की खुनींना शिक्षा देण्यासाठी नेमकी काय कारवाई केली जात आहे आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घटना कट्टरपंथी युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर घडली. शशी थरूर यांच्यासह काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तातडीने बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आज 7 आरोपींना अटक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने एक्सवर दिलेल्या निवेदनात सांगितले की, रॅपिड अॅक्शन बटालियनने (आरएबी) या प्रकरणात 7 संशयितांना अटक केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या कारवायांदरम्यान या अटका करण्यात आल्या असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वय 19 ते 46 वर्षांच्या दरम्यान आहे. या जघन्य गुन्ह्यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओळख मोहम्मद लिमोन सरकार (19), मोहम्मद तारेक हुसेन (19), मोहम्मद माणिक मिया (20), इरशाद अली, निजुम उद्दीन, अलोमगीर हुसेन (38) आणि मोहम्मद मिराज हुसेन एकॉन (46) यांचा समावेश आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी