रायगड - बंदी असलेला विमल गुटखा दुकानात सापडला; माणगावात खळबळ
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.) माणगाव पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी कारवाई करत तब्बल ८२ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवा
रायगड - बंदी असलेला विमल गुटखा दुकानात सापडला; माणगावात खळबळ


रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.) माणगाव पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी कारवाई करत तब्बल ८२ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास मौजे माणगाव येथील जलाराम जनरल स्टोअर्स येथे करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरजोली (ता. रोहा) येथील रहिवासी असून त्याने शासनाच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करत बंदी असलेला विमल पानमसाला साठवून विक्रीसाठी ठेवला होता.

हा सुगंधी गुटखा मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक व अपायकारक असल्याची माहिती असतानाही आरोपीने केवळ आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुप्त माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल पानमसाला आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून एकूण ८२,६७८ रुपये किमतीचा गुटखा व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२१/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार श्री. फडताडे हे करीत असून आरोपीकडून गुटखा कुठून आणला गेला, आणखी कोण यामध्ये सहभागी आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande