
सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, वैराग येथे छापे टाकत देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून एकूण 16 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आगामी 31 डिसेंबर तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून अवैध दारू निर्मिती, विक्री तसेच हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी उत्पादन शुल्कच्या भरारा पथकाने छापे टाकून कारवाई केली.
पंढरपूरच्या भरारा पथकाने गोपाळपूर येथे गोवा बनावटीच्या विदेशी दारुच्या बाटल्या, बनावट टोपणे तसेच वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार जप्त केली. कुर्डूवाडीच्या पथकाने बार्शी जवळील इंदापूर परिसरात विदेशी मद्यांसह विदेशी मद्यांची पाच हजार 375 टोपणे जप्त केली. कुर्डूवाडी तसेच माळशिरसच्या पथकाने विविध हातभट्टी अड्ड्यांवर छापे मारले. यामध्ये 24 हजार 180 लिटर गुळमिश्रित रसायन, 680 लिटर हातभट्टी, 39 लिटर विदेशी व 28 लिटर देशी, असा एकूण साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड