
नवी दिल्ली, 21 डिसेंबर (हिं.स.)।भारतामधील बांगलादेश उच्चायोगासमोर झालेल्या कथित आंदोलनाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली असून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाने बांगलादेशातील काही माध्यमांवर दिशाभूल करणारा प्रचार केल्याचा आरोप करत सांगितले की, 20 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाबाहेर कोणतीही सुरक्षा समस्या निर्माण झाली नव्हती.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, 20 डिसेंबर 2025 रोजी सुमारे 20 ते 25 तरुणांचा एक छोटा गट बांगलादेश उच्चायोगासमोर जमा झाला होता. हे लोक बांगलादेशातील मयमनसिंह येथे हिंदू युवक दीपु चंद्र दास यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ घोषणा देत होते. तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची मागणीही ते करत होते.
रणधीर जायसवाल यांनी स्पष्ट केले की या दरम्यान कुठल्याही प्रकारे बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न झाला नाही किंवा कोणतीही सुरक्षा धोक्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी काही मिनिटांतच त्या गटाला शांततेने हटवले. या संपूर्ण घटनेचे दृश्य पुरावे सार्वजनिकरित्या उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी हेही सांगितले की बांगलादेशातील काही माध्यमांनी या घटनेचे अतिशयोक्तीपूर्ण आणि चुकीचे चित्रण केले आहे.परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की भारत, व्हिएन्ना करारानुसार, आपल्या हद्दीत असलेल्या सर्व परकीय दूतावास आणि राजनैतिक मिशनच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की भारत बांगलादेशातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. भारतीय अधिकारी बांगलादेशी प्रशासनाच्या संपर्कात असून, अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एमईएने दीपु चंद्र दास यांच्या हत्येतील दोषींना लवकरात लवकर न्यायासमोर आणण्याचे आवाहनही केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode