नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
* भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार * विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई, २१ डिसेंबर (हिं.स.) : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत
भाजपा जल्लोष


भाजपा जल्लोष


भाजपा जल्लोष


* भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार

* विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई, २१ डिसेंबर (हिं.स.) : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. 125 पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि 1100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केले. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या विजयोत्सवावेळी ते बोलत होते. ढोलताशांचा गजर करत ,गुलाल उधळत, मिठाई वाटप करीत भाजपाचा विजय साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते आ. श्रीकांत भारतीय, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सचिव भरत राऊत, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. भाजपा कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून या निवडणुकीत मेहनत घेतली असून हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कामकाजावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासामुळे हा विजय सत्यात उतरला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कार्यकारी अध्यक्ष नितीन नबिन, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अरुण सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने लढली. या विजयाचे सर्व श्रेय हे मंत्री, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते आणि अर्थातच मतदारांचे आहे. या विजयाचा सन्मान राखत राज्यातील जनतेने भाजपा महायुतीकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस हे एकमेव नेतृत्व राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. मराठवाडा ग्रीड मुळे अनेक ठिकाणी पाणी पोचले, विदर्भाचा अनुशेष भरून काढला जात आहे, कोकणाचा समृद्ध विकास होत आहे. अशा रितीने प्रत्येक विभागाचा विकास केला म्हणून जनतेने भाजपा महायुतीला कौल दिला असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

विरोधकांचा समाचार घेत श्री. चव्हाण म्हणाले की, विरोधकांनी हीन टीका केली, फेक नरेटिव्ह पसरवले तरीही मतदारांनी भाजपावर विश्वास टाकला. उद्धव ठाकरे म्हणाले होते राज्याच्या जनतेला देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून उबाठा गटाची लायकी जनतेने ओळखत त्यांना काहीच दिले नाही, उबाठा गट दोन आकडी मजल देखील मारू शकला नाही असा टोमणा श्री. चव्हाण यांनी लगावला. यापुढेही आगामी निवडणकांमध्ये जनता भूलथापांना बळी पडणार नाही आणि मुंबईकर तर नाहीच नाही असे त्यांनी स्पष्ट केले. स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी जनता भाजपा महायुतीसोबतच राहील असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचंड मेहनत

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका ह्या सामान्य कार्यकर्त्यांच्या असतात. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मेहनत घेतली. राज्यात 50 हून अधिक ठिकाणी श्री. फडणवीस यांनी सभा घेतल्या. ज्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते तेथे दूरध्वनीवरून,ऑनलाइन पद्धतीने मतदारांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि राज्याचा केलेला विकास यामुळे हा विजय प्राप्त झाल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याला सलाम करत राज्याच्या कानाकोप-यातील समस्यांची जाण देवेंद्रजींना आहे आणि त्यावर मात करण्याचे कसबही आहे म्हणून हा विजय मिळाला आहे.

महापालिका निवडणुकीतही विकासाच्या मुद्यावर महायुतीला मोठे यश मिळेल

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे. राज्यात पायाभूत सुविधा विकासाची मोठी कामे महानगरांमध्ये सुरु आहेत. याच कामांच्या आधारावर महापालिका निवडणुकीतही मतदार विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला विजयी करतील, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande