
कोल्हापूर, 21 डिसेंबर, (हिं.स.)।
कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये १३ पैकी ११ नगरपालिकांवर महायुतीच्या घटक पक्षांची सत्ता आली. केवळ 2 नगर पालिकेत काँग्रेसला यश मिळाले. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. जयसिंगपूर, शिरोळ, मुरगुड आणि कुरुंदवाड या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाने विजय खेचून आणला आहे. पाठोपाठ भाजपनेही चंदगड, हुपरी आणि आजरा या तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. याबरोबरच नगरसेवक पदेही भाजप शिवसेना शिंदे गटाने जास्तीत जास्त मिळवून बहुमत प्राप्त करून सत्ता मिळवली आहे. यामुळे भाजप शिवसेना महायुतीला जिल्हयात लक्षणीय यश मिळाल्याचे चित्र आहे.
काँग्रेसला अवघ्या दोन ठिकाणी समाधान मानावे लागलं असून पेठवडगाव आणि शिरोळ या ठिकाणी विजय मिळवला आहे. जनसुराज्यला पन्हाळा आणि मलकापूर येथील नगराध्यक्षपदावर विजय मिळाला आहे. दोन्ही राष्ट्रवादीने आघाडी करून गडहिंग्लज आणि कागलमध्ये विजय मिळवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार, आणि शिवसेना ठाकरे गटाची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यांना नगराध्यक्षपदाची एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला २ ठिकाणी यश मिळाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीने नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही महायुतीचा घटक आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये मलकापूर आणि पन्हाळा नगरपरिषद नगराध्यक्षपद मिळवून आपले गड राखले आहेत.
कागलच्या राजकारणात या निवडणूकीच्या निमित्ताने वेगळे वळण घेतले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र आले होते. याची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती. कागलमध्ये या नव्या आघाडीला नगराध्यक्षपद मिळाले आणि नगर सेवक पदाच्याही सर्व जागा जिंकता आल्या. अर्थातच दोघा नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या परस्पर निर्णय घेऊनही त्यांचा हा नवा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. मुरगुडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी अपयशी ठरली. त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागले. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला. आणि मुरगुड नगरपालिकेवर सत्ता सुद्धा मिळवली आहे. त्यांना शिवसेना शिंदे गटाचे असलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही चांगली साथ दिली.
वडगाव नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यादव आघाडीच्या विद्यादेवी गुलाबराव पोळ या 2263 मतांनी निवडून आल्या आहेत. यादव गटाच्या 15 नगरसेवक तर विरोधी सालपे गटाचे नगरसेवक पदाचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. येथे सालपे गटाबरोबर जनसुराज्यचे आ. विनय कोरे, भाजपचे आ. अमल महाडिक यांनी प्रयत्न केले पण त्यानां अपेक्षित यश मिळाले नाही. सालपे गटाच्या ताराराणी आघाडीला दोन, जनसुराज्यला दोन तर काँग्रेसच्या यादव आघाडीच्या विद्याताई पोळ यांना नगराध्यक्ष पदासह १६ जागा मिळाल्या
जयसिंगपूरमध्ये शिंदें शिवसेनेचे माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आपले बंधु संजय पाटील यड्रावकर यांच्या नगराध्यक्ष पदासह २६ पैकी २० जागा जिंकून सत्ता आबाधित ठेवली. त्यांच्या विरोधात आ. सतेज पाटील, खा. धनंजय महाडिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन शिरोळ तालुका विकास आघाडी म्हणून मोट बांधली पण त्यांना अवघ्या ५जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला.
हुपरीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. नगराध्यक्षपदी भाजपचे मंगळराव माळगे विजयी झाले. नगराध्यक्षपदासह भाजपने 15 जागा जिंकल्या, शिंदेसेनेला चार जागा तर मनसे दोन जागांवर विजय मिळाला. येथील महायुतीची सर्व जबाबदारी इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या शिरावर घेऊन ती सक्षमपणे पार पाडली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाला जागा दिल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अस्तित्व नसल्याने त्यांनी या पक्षाला प्रतिनिधीत्व दिले नाही. तरीही या ठिकाणी महायुती म्हणून एकोपा दिसला.
महविकास आघाडीतील फुटीने त्यांचा धुव्वा उडाला. शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढला. त्याना एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी एकत्र येऊनही त्यांच्या काहीच पदरात पडले नाही. युवक क्रांती म्हणून मनसेने दोन जागा जिंकत आपले अस्तीत्व दाखवून दिले. विरोधक म्हणून एकत्र येऊन आणखी काही जागा त्यांच्या पदरात पडल्या असत्या.
चंदगडच्या निवडणुकीत भाजपाने बहुसंख्य प्रभागांमध्ये विजय मिळवत नगरपंचायतीवर स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपचे काणेकर सुनील सुभाष विजयी झाले.
*कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्ष*
*कागल* - सविता प्रताप माने (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राजर्षी शाहू आघाडी),
*मुरगूड* -सुहासिनी प्रविणसिंह पाटील (शिवसेना, भाजप),
*चंदगड* - सुनील काणेकर (भाजप), *जयसिंगपूर* राजेंद्र पाटील यड्रावकर (राजर्षी शाहू विकास आघाडी),
*गडहिंग्लज* महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष),
*हातकणंगले* अजितसिंह पाटील (शिवसेना ),
*कुरुंदवाड* - मनिषा डांगे (राजर्षी शाहू आघाडी),
*पेठवडगाव* -विद्या पोळ (यादव आघाडी),
*पन्हाळा* जयश्री पोवार (जनसुराज्य शक्ती पक्ष, मित्र पक्ष),
*शिरोळ* - योगिता कांबळे (संयुक्त शिवशाहू यादव गट, काँग्रेस, स्वाभिमानी आघाडी),
मलकापूर - रश्मी शंतनु कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष भाजप), हुपरी - मंगलराव माळगे (भाजप), आजरा अशोक चराटी (ताराराणी आघाडी, भाजप).
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar