
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने फार्महाउस फोडून सागवाण फर्निचर व महागडे स्पीकर चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ते डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मौजे देवकठपा, पिकार्डो फार्महाउस, टाकवे, कर्जत येथे ही चोरी झाली. अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या पिकार्डो फार्महाउसच्या खिडकीस असलेली लोखंडी ग्रील उचकून त्यावाटे आत प्रवेश केला.
फार्महाउसच्या आत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने सागवाण लाकडाच्या खुर्च्या, डायनिंग टेबलवरील दोन सागवाण लाकडी खुर्च्या तसेच वॉफडेल कंपनीचे दोन स्पीकर असा एकूण १ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बाब लक्षात येताच फिर्यादी यांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३८/२०२५ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल वरोटे हे करीत आहेत.
दरम्यान, फार्महाउस परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके