
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)। म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने फार्महाउस फोडून घरातील ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ते २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ही चोरी घडली. मौजे मांदाटणे येथील फिर्यादी यांचे मालकीचे फार्महाउस असून ते सध्या डी–१५०४, सेरेनिटी लोकशोअर, ग्रीन खोनी, पलावा, तळोजा बायपास, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे येथे वास्तव्यास आहेत.
अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या फार्महाउस मधील बंद घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून जबरदस्तीने आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने फिर्यादी यांच्या मालकीचा सुमारे २८ हजार ५०० रुपये किमतीचा माल चोरी करून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी ही फिर्यादी यांच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही बाब लक्षात येताच फिर्यादी यांनी तात्काळ म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरवे हे करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. फार्महाउस परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलिसांकडून गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके