
अमरावती, 21 डिसेंबर (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात रोशन कुळे या शेतकऱ्याला अवैध सावकारांच्या छळामुळे कर्ज फेडण्यासाठी स्वत:चे मूत्रपिंड विकावे लागल्याच्या धक्कादायक प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असताना या गंभीर अन्यायाकडे शासनाचे दुर्लक्ष अस्वस्थ करणारे आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी मिंथूर ते नागभीड असा पायदळ ‘लाँग मार्च’ काढण्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, अतिशय मनस्ताप देणारी घटना मिंथूर येथे घडली आहे. एका शेतकऱ्याला अवैध सावकाराने केवळ १ लाख रुपयांचे कर्ज दिले; मात्र बेकायदेशीर व्याज, दंड आणि धमकीच्या जोरावर ७४ लाख रुपयांपर्यंत वसुली केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी पीडित शेतकऱ्याने आतापर्यंत शेती, ट्रॅक्टर, दोन मोटारसायकली तसेच अन्य मालमत्ता विकली; तरीही छळ थांबला नाही. अखेर या यंत्रणेने त्याला आपले मूत्रपिंड विकण्यापर्यंतची वेळ आणली, हे अत्यंत धक्कादायक आणि अमानवी आहे.
स्थानिक माहितीनुसार सदर अवैध सावकाराचा सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंध असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक, निष्पक्ष आणि कठोर चौकशी होऊन दोषींवर तातडीने कडक कारवाई व्हावी, ही जनतेची ठाम मागणी आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी ३ जानेवारी रोजी आई जिजाई व सावित्रीमाई फुले जयंतीच्या दिवशी “मिंथूर ते नागभीड” असा पायदळ लाँग मार्च आयोजित करण्यात येत आहे.
या अवयव तस्करी प्रकरणात दलाल, सावकार, डॉक्टर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, मानवी तस्करी, अपहरण, फोन करून धमक्या देणे, मारहाण, फसवणूक, पासपोर्ट ॲक्ट आदी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी कडू यांनी केली आहे. खासगी सावकारांकडून बळजबरीने कर्ज वसूल करण्याचे गुन्हे महाराष्ट्रात सर्रास घडत आहेत. यावर सरकारचे नियंत्रण नाही, सरकार यासंदर्भात संवेदनशील नाही. या प्रकरणी सत्यशोधन समिती गठीत करावी, असे बच्चू कडू म्हणाले. पैसे नाहीत म्हणून अवयव विकावे लागणे ही लहान गोष्ट नाही, ज्या पद्धतीने या शेतकऱ्याला विदेशात जाऊन मूत्रपिंड काढण्यासाठी भाग पाडले गेले, त्याची चौकशी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी होती. समिती नेमायला हवी होती, पण तसे झाले नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
----------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी