
पुणे, 22 डिसेंबर (हिं.स.)।
महर्षी दयानंद सरस्वती यांनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला आर्य समाज म्हणजे तत्कालीन काळात असणाऱ्या अंधश्रद्धे विरुद्ध सुरू केलेली एक राष्ट्रवादी चळवळ आहे. त्यांनी देशातील पहिली गोशाळा हरियाणामध्ये सुरू केली. ब्रिटिश सरकारने मीठ करमुक्त करावे यासाठी सर्वप्रथम महर्षी दयानंद सरस्वती यांनी सह्यांची मोहीम राबविली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आर्य समाजाचे उल्लेखनीय योगदान आहे, असे प्रतिपादन जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांनी केले. पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी येथे तीन दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन व अमृतसर पंजाब येथील पंडित दिनेश आर्य यांचे भजन, यज्ञ हवन, पुरस्कार वितरण, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. समारोपाच्या दिवशी रविवारी, आर्य समाज चळवळीत विशेष योगदान देणारे उत्तम दंडीमे, शकुंतला दंडीमे, लक्ष्मी कलबुर्गी, रमेश वासवानी, वीणा वासवानी, रमेश धर्माणी, मीना धर्माणी, श्रुत चव्हाण, शुभलता चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्र निर्माण मे हमारे कर्तव्य या विषयावर स्वामी सच्चिदानंद यांनी प्रवचन दिले. पंडित दिनेश आर्य यांनी सुश्राव्य वाणीमध्ये भजन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु