
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.) | सेना (उबाठा) आणि मनसेच्या संभाव्य युतीवर आमदार रवी राणा यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज्यातील उबाठाची अवस्था ही “घराबाहेरी वर्हांड्यातील बाकड्याप्रमाणे” झाली असल्याचा टोला लगावत, महाराष्ट्रातील सर्वात ढ पक्ष म्हणजे उबाठा असल्याचा आरोप त्यांनी केला.
उबाठा–मनसे युती ही केवळ मजबुरीतून होत असून, भाजपला रोखण्यासाठी हे पक्ष एकत्र येत असल्याचे रवी राणा म्हणाले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आज भाजपमध्येच असल्याचा दावाही त्यांनी केला. उबाठाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आता मनसेसोबत युतीकडे वाटचाल सुरू केली असून, उद्धव ठाकरे सत्तेसाठी बेचैन झाल्याचा आरोप राणांनी केला. त्यांना महाराष्ट्राच्या हिताचे काही देणेघेणे नसल्याचेही त्यांनी म्हटले.
मुंबई महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांना दररोज उत्पन्न मिळत असून, वसुलीचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू राहावे यासाठीच ही सर्व राजकीय हालचाल सुरू असल्याची टीकाही आमदार रवी राणा यांनी केली.
बळवंत वानखडे यांना ब्रेक डान्सची गरज नव्हती; निवडून आलेले नगरसेवक रवी राणांचेच – आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि दर्यापूर नगरपरिषदांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येत नगराध्यक्ष विजयी झाल्यानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी डान्स करत आनंद साजरा केला होता. या डान्सवर आमदार रवी राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
बळवंत वानखडे यांचा ब्रेक डान्स आपण पाहिल्याचे सांगत, त्यांना अशा प्रकारे आनंद व्यक्त करण्याची गरज नव्हती, असा टोला रवी राणांनी लगावला. चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसतर्फे निवडून आलेले बहुतांश नगरसेवक हे आपले समर्थक असून रवी राणा यांनाच मानणारे आहेत, असा मोठा आणि खळबळजनक दावा त्यांनी केला.
“थोड्याच दिवसांत याचा परिणाम दिसून येईल,” असे सांगत रवी राणांनी सूचक इशारा दिला. त्यांच्या या दाव्यानंतर चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवकांची फोडाफोडी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी