
चिंचवड, 22 डिसेंबर (हिं.स.)। शिक्षण क्षेत्रातील मूल्याधिष्ठित, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ने प्राचार्य विठ्ठल बबनराव गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. स्विफ्ट निफ्ट मीडिया ग्रुप यांच्या वतीने हा पुरस्कार एल्प्रो मॉल सभागृह,चिंचवड येथे देण्यात आला.
हा राज्यस्तरीय पुरस्कार येवले ग्रुपचे सर्वेसर्वा नवनाथ येवले व स्विफ्ट अँड लिफ्ट चे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य गायकवाड यांना यापूर्वी शिक्षण रत्न, उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून मूल्यशिक्षण, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आधुनिक अध्यापन पद्धती यांचा समतोल साधणारे प्राचार्य गायकवाड यांचे कार्य शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरत आहे. प्राचार्य म्हणून त्यांनी शिक्षणाला केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर, जबाबदारीच्या जाणिवेवर आणि सकारात्मक जीवनदृष्टी घडविण्यावर भर दिला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्कार, नेतृत्वगुण आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जाणीव निर्माण करणारे ठरले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानाची पोचपावती म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
२१ डिसेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन सागर ढोले पाटील यांनी प्राचार्य गायकवाड यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule