
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : भाजपा जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांनी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या सहा नगरसेवकांचा सन्मान केला.
रत्नागिरी पालिका निवडणुकीत प्रथमच नगरसेविका म्हणून प्रभाग १५ मधून निवडून आलेल्या सौ. वर्षा ढेकणे आणि प्रभाग १ मधून नितीन जाधव, प्रभाग १० मधून नगरसेविका सौ. मानसी करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, प्रभाग ११ मधून सौ. सुप्रिया रसाळ आणि नगरसेवक समीर तिवरेकर यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन ॲड. पटवर्धन यांनी केला. भाजपने महायुतीमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली व सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनादेखील प्रत्येक प्रभागातून मताधिक्य दिले आहे. याबद्दल भाजपच्या सर्व नगरसेवकांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी स्वामी व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप रसाळ, सचिन करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. पटवर्धन यांनी सर्व नगरसेवक, नगरसेविकांचे अभिनंदन करून चांगल्या मताधिक्याने यश मिळवल्याबद्दल कौतुक केले. प्रभागाच्या विकासासाठी काम करावे. चांगल्या योजना प्रभागासाठी आणाव्यात, प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. रस्ते विकास, गटार बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य याकडे विशेष लक्ष द्यावे. पालिकेत आपली चुणूक दाखवावी, अशी सूचनाही ॲड. पटवर्धन यांनी या वेळी केली.
यावेळी नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रिया तसेच प्रचारादरम्यान आलेले अनुभव सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी