
परभणी, 22 डिसेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने 182 पैकी 86 जागांवर निवडणूक लढवून 42 जागांवरील यशासह तीन नगराध्यक्षपदे मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. भाजपा हा स्ट्राईक रेट 70 ते 80 टक्के असल्याचा दावा करीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी महानगरपालिका निवडणूकीतही भाजप मोठे यश मिळवून क्रमांक 1 चा पक्ष ठरेल, असा विश्वास सोमवारी (दि.22) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिंतूर रोडवरील पालकमंत्री संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नूतन नगराध्यक्ष मिलींद सावंत (सेलू), प्रताप देशमुख (जिंतूर), परमेश्वर कदम (सोनपेठ) आदींसह नगरपालिका निवडणूकीतील विजयी उमेदवार उपस्थित होते.
मंत्री बोर्डीकर म्हणाल्या, नगरपालिका निवडणूकीत भाजपला मिळालेले यश हे केंद्र व राज्य सरकारने केलेल्या ‘सब का साथ, सब का विकास’चे प्रतिक आहे. त्यामुळे या निवडणूकीत सर्व समाज घटकांनी भाजपच्या कमळ चिन्हाला पसंती दिली. जिंतूर सारख्या मुस्लिम बहुल शहरातही विक्रमी मताधिक्याने प्रताप देशमुख हे विजयी झाले. सेलूमध्येही जनतेने भाजपच्या पाठीशी राहून मिलींद सावंत यांना विजयी केले. परंतु, सेलूत काहींनी केलेल्या अपप्रचारामुळे पॅनलप्रमुख विनोद बोराडे यांना पराभव पत्करावा लागला. सोनपेठमध्ये जनसुराज्य पक्षाला भाजपने पुरस्कृत करीत 25 वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचे काम केले. पूर्णेत दोनच उमेदवार उभे करुन ते विजयी करण्याचे काम पक्ष संघटनेने केले आहे. पाथरी व मानवत बाबत काही बाबी लक्षात घेऊन निवडणूक ताकदीने लढवली गेली नाही. मानवत व गंगाखेडमधील अपयश लक्षात घेऊन झालेल्या चूका दुरुस्त करण्याचे काम केले जाईल, अशीही स्पष्टोक्ती मंत्री बोर्डीकर यांनी दिली. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाशी युती करुन सर्व समाजघटकातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, त्या माध्यमातून विजयाचा आलेख उंचावण्याचे काम केले जाणार आहे, येत्या दोन दिवसात हे सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या.
12 ठिकाणी मुस्लिम विजयी...
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, मुस्लिम समाज भाजपच्या पाठीशी असल्याचा प्रत्यय निवडणूकीतील यशाने आला आहे. तब्बल 12 मुस्लिम उमेदवार कमळ चिन्हावर विजयी झाले आहेत. जिंतूरात 6 तर सेलू व सोनपेठ प्रत्येकी 3 मुस्लिम उमेदवारांनी यश संपादन केले. यावरुन मुस्लिम समाजही भाजपच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात असून महानगरपालिका निवडणूकीतही मुस्लिम उमेदवारांना भाजप निवडणूक रिंगणात मोठ्या संख्येने संधी देणार असल्याचीही माहिती पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis