
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा सरकारला इशारा
नागपूर, 22 डिसेंबर (हिं.स.) । गॅस टँकरला व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) तंत्रज्ञान बसवण्याच्या कारणाखाली गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची आर्थिक लूट करणाऱ्या गॅस एजन्सींवर अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांनी केली आहे.
या संदर्भात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गॅस एजन्सी मालक विविध कारणे पुढे करून निर्धारित दरांपेक्षा जास्त दराने सिलिंडरची विक्री करत असून ग्राहकांकडून काळ्या बाजारातून पैसे उकळले जात असल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत कमी असल्याने अनेक हॉटेल, कॅटरिंग, वेल्डिंग, तसेच फुटपाथवरील खाद्यपदार्थ विक्रेते सर्रास घरगुती सिलिंडरचा वापर करतात. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि सामान्य ग्राहकांना ब्लॅकमध्ये सिलिंडर खरेदी करण्यास भाग पाडले जाते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहक पंचायतने प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काही ठिकाणी साटेलोटे असल्याची शक्यताही व्यक्त केली आहे. केवळ नाममात्र कारवाई होत असल्याने गॅस एजन्सी मालक अधिक निर्ढावले असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
याशिवाय काही भागांमध्ये भरलेल्या सिलिंडरमधून पाईपद्वारे गॅस काढून अर्धवट भरलेले सिलिंडर ग्राहकांना पूर्ण दराने विकले जात असल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांची दुहेरी फसवणूक होत असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी