
नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)।
: नगर परिषद व नगरपालिकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले असून भाजप हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. हे निकाल कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असून, काही ठिकाणी अंदाज चुकले असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत जनता आपल्यालाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाजन बोलत होते. निकालांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वरचा निकाल अनपेक्षित ठरला. तेथे शिंदे गटाच्या शिवसेनेचा, म्हणजेच महायुतीतील मित्र पक्षाचा उमेदवार निवडून आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचा उमेदवार विजयी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. तरी उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील एकूण निकाल समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीवर टीका करताना महाजन म्हणाले, “या निवडणुकीत पवार साहेब आणि उबाठा गटाचे प्रमुख घराबाहेरही पडले नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे मतदार त्यांना योग्य धडा शिकवत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत याहूनही वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढावेल.”
महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना महाजन म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट)सोबत चर्चा सुरू आहे. दादा भुसे व समीर भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या एक-दोन दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उर्वरित ४० जागांमध्ये अन्य घटक पक्षांचा समावेश असून सुवर्णमध्य काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
“आम्ही महायुतीतच महापालिका निवडणुका लढवणार आहोत. युती झाल्यास बहुसंख्य जागा भाजपच्याच येतील,” असा दावा करत महाजन म्हणाले की, सध्या ७८ ते ८० नगरसेवक भाजपचे आहेत. महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देखील सहभागी असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही सगळेच धुरंदर आहोत. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून महापालिका निवडणुकीत परिस्थिती आणखी खराब होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनसे–शिवसेना (उबाठा) युतीबाबत बोलताना महाजन म्हणाले, “त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. मराठी मुद्दा उगाच काढला जातो; मात्र मराठी माणसाचा त्यांच्यावरचा विश्वास संपलेला आहे. सभा होतील, गर्दीही जमेल; पण मतदान होणार नाही,” असा दावाही त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV