
चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.) स्वस्त, सुलभ आणि विकेंद्रित शिक्षण व आरोग्य सेवा या प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. चंद्रपूर येथे पंडित दीनदयाल कॅन्सर रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. भागवत यांनी सांगितले की कॅन्सरसारख्या आजारांचा परिणाम केवळ रुग्णांपुरता मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबावर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संकट ओढवते. त्यामुळे उपचारांसोबतच रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधार देणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाने सेवाभावातून पुढे येत केवळ आर्थिक मदत नव्हे, तर वेळ देण्याचीही गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.तणाव, प्रदूषण आणि भेसळयुक्त अन्न यांसारख्या कारणांमुळे कॅन्सरसारखे आजार वाढत असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्यावर भर दिला. तपासणी व उपचारासाठी वारंवार दूरच्या शहरांमध्ये प्रवास करावा लागल्याने खर्च, वेळ आणि मानसिक ताण वाढतो. ही अडचण लक्षात घेता उपकेंद्रांच्या माध्यमातून रुग्णांच्या जवळच सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार दूरदृष्टीपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूरमध्ये उच्च दर्जाच्या तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध झाल्याने नागपूर किंवा मुंबईसारख्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. या रुग्णालयातून वैद्यकीय उपचारांसोबत करुणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचा संगम घडावा, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. भागवत यांनी समाजाच्या सक्रिय सहभागातून हे केंद्र आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी