
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला महानगरपालिकेचा जाहीरनामा जाहीर करत शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी त्यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला तसेच राज्यभरात भाजप वगळता सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू असून सध्या कोणत्याही पक्षाला ठोस डेडलाईन देता येणार नाही असे सांगितले
मुंबईत काँग्रेससोबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर सूचक टीका केली. “आमची बोलणी जवळपास झाली असल्याचं नेहमी सांगितलं जातं, मात्र जाहीर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही,” असा चिमटा त्यांनी घेतला.तसेच, “आम्ही मुंबईत २०० जागा लढवण्याची पूर्ण तयारी ठेवली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधूंमधील चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपाबाबतही चर्चा पूर्ण झाली असून काही ठिकाणी जागांच्या वाटपावरून त्यांचा वाद असल्याचे संकेत आंबेडकरांनी दिले.या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे