
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चालू महिन्यात काही चालू दिवसापूर्वी रोजी रात्री सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास मौजे नेरळ गावातील हेटकर आळी येथील सोहम अपार्टमेंट गेटसमोर गंभीर अपघात घडला. भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या अॅक्टीवा स्कुटीने पादचाऱ्यास धडक दिल्याने संबंधित व्यक्तीस दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
फिर्यादी (रा. रूम नं. २०१, दुसरा मजला, सोहम अपार्टमेंट, हेटकर आळी, नेरळ, ता. कर्जत) यांच्या आई व साक्षीदार हे सोहम अपार्टमेंटकडे पायी जात असताना, आरोपी (रा. दिंगबर कॉम्प्लेक्स, ब्राम्हण आळी, नेरळ, ता. कर्जत) याने त्याच्या ताब्यातील निळ्या रंगाची अॅक्टीवा स्कुटी क्रमांक एम. एच. ४६ बी. एल. ३७०६ ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे चालवली. समोरून आलेल्या स्कुटीची जोरदार धडक बसल्याने जखमी पादचाऱ्यास दोन्ही पायांना गंभीर इजा झाली.
अपघातानंतर जखमीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३२/२०२५ अन्वये मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २८१, १२५(अ) व १२५(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कोळंबे हे करीत आहेत.
भरधाव व निष्काळजी वाहनचालना विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी वाहन चालविताना आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके