
रायगड, 23 डिसेंबर (हिं.स.)।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मौजे सापेले, पो. कडाव, ता. कर्जत येथे ही घटना घडली. येथील महिला फिर्यादी या मजुरीच्या कामासाठी बाहेर गेल्या असताना त्यांची मुलगी (वय १६ वर्षे ११ महिने २१ दिवस) ही घरातच होती. सदर मुलगी अल्पवयीन असल्याचा तसेच तिच्या अज्ञानाचा फायदा घेत, कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून अज्ञात कारणासाठी घरातून पळवून नेल्याचा आरोप आहे.
संध्याकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली; मात्र तिचा काहीही थांगपत्ता न लागल्याने अखेर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींची चौकशी करणे आदी बाबींवर भर देण्यात येत आहे. अधिक तपास म.पो.उपनिरीक्षक श्रीमती मीनल शिंदे या करीत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत असून पोलिसांनीही नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके