
परभणी, 23 डिसेंबर (हिं.स.)। सत्ताधाऱ्यांकडे धनशक्ती आहे, परंतू आमच्याकडे जनशक्ती आहे. याच जनशक्तीच्या साथीने परभणी महानगरपालिकेवर मशाल पेटवायची इच्छा आहे. कोणत्याही परीस्थितीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला महापालिकेच्या सत्तेत बसवायचे आहे. परभणीचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. त्यासाठी परभणीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी निर्धार मेळाव्यात बोलताना केले.
येथील अक्षदा मंगल कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव,माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला, प्रसिद्ध उद्योजक,समाजसेवक सय्यद कादर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अंबिका डहाळे, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, दलित आघाडी जिल्हाप्रमुख संजय सारणीकर, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, संदिप झाडे, सुभाष जोंधळे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, विशु डहाळे, अमोल गायकवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी संपर्क प्रमुख खोपडे म्हणाले, परभणी महापालिकेवर शिवसेना ठाकरे पक्षाची सत्ता येणार हे आजच्या निर्धार मेळाव्यातील उपस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. शहराला बदलायचे असेल, पुढे न्यायचे असेल तर शहरातील नागरिकांनी धनशक्तीच्या मागे न जाता जनसेवकांच्या मागे खंबीरपणे उभे गरजेचे आहे असे म्हटले.परभणी शहर आणि जिल्हा शिवसेना ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथील मतदार मनपाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षासोबत निश्चित खंबीरपणे उभे राहणार असा विश्वास खोपडे यांनी व्यक्त केला.
यावेळी खा. जाधव म्हणाले, राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकत आहेत. नगरपालिका निवडणुकीत एका मताला २० ते २५ हजार रूपये देऊन मते विकत घेतली. त्यामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनसेवा करण्याऐवजी पैसे कमावण्यालाच प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांनी याचा विचार करावा. परभणीत देखील धनशक्तीची जोरात चर्चा आहे, सत्ताधारी पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात. परंतु मतदारांनी सावध रहावे. ज्याप्रमाणे शेतकºयांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन सत्ताधाºयांनी पाळले नाही. निवडणुकीत अशी आश्वासने द्यावीच लागतात असे म्हणत मतदारांची खिल्ली उडवणाºया सत्ताधाºयांनाही महापालिकेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीचे उत्तर मतदारांनी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार डॉ.राहुल पाटील आणि मी एकच आहोत, विरोधकांनी कितीही वावड्या उठविल्या तरी आमच्या एकीची वज्रमूठ पक्की आहे. हीच एकी आपण सर्वांनी मनपाच्या निवडणुकीत दाखवून द्यावी. काम करणाºया कार्यकर्त्याला यावेळेस संधी दिली जाईल, ज्यांना संधी मिळणार नाही अशांनी नाराज न होता स्वत:च उमेदवार समजून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आ.डॉ.पाटील यांनी आपल्या भाषणात शहराच्या बकाल अवस्थेला सत्ताधाºयांना जबाबदार धरत जोरदार टीका केली. ते म्हणाले शहरातील अनेक विकास कामांची आपण मागणी करूनही सत्ताधाºयांकडून जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही. शहरातील नाट्यगृहासह शहरातील इतर महत्वपूर्ण विकास कामांसाठी वारंवार पाठपुरावा करून विधानसभा सभागृहात निधीची मागणी केली. परंतू सरकारने आपण विरोधी पक्षात असल्यामुळे विकास कामांचा निधी रोखत परभणीकरांना छळण्याचे पाप केले आहे. परभणीचा विकास रोखणाºयांना आता आपण मनपा निवडणुकीतून उत्तर द्यायचे आहे. परभणी महानगरपालिकेच्या शहरात अनेक मालमत्ता आहेत.
परंतु त्याचा विकास झाला नसल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवायचे असेल तर मनपाच्या जागांचा विकास झाला पाहिजे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता येताच राजगोपालचारी उद्यान भोवती व्यापारी संकुल उभारण्यात येईल. तसेच इतरही मालमत्तांचा विकास करून महपालिकेचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यात येतील. त्यामुळे सरकारकडे हात पसरण्याची वेळ महानगरपालिकेला येणार नाही. मुंबईच्या धर्तीवर परभणी महानगरपालिकेला श्रीमंत महानगरपालिका करण्याचा निर्धार यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.
या दिग्गजांनी केला शिवसेनेत प्रवेश यावेळी माजी उपमहापौर माजू लाला, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक सय्यद इकबाल, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिंह ठाकुर, भाजपाचे माजी नगरसेवक नंदकिशोर दरक, माजी नगरसेवक शाम खोबे, भाजप नेते डॉ. अनिल कांबळे, डॉ. सुनील जाधव यांनी हजारो कायकर्त्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis