
जळगाव, 23 डिसेंबर, (हिं.स.) - धरणगाव तालुक्यातील अहिरे गावात बंद झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेल्या वायरमनचा तीव्र विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे चोपडा व धरणगाव तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चोपडा तालुक्यातील पारगाव येथील मूळचे रहिवासी बापू शालीक बोरसे (वय ४७) हे सद्यस्थितीत नांदेड येथे वास्तव्यास होते. नांदेड येथील महावितरण कार्यालयातून दीड वर्षांपूर्वी त्यांची सोनवद येथील कार्यालयात बदली झाली होती. ते वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत होते.
दरम्यान, रविवारी रात्री अहिरे गावातील वीजपुरवठा बंद असल्याची माहिती त्यांना मोबाईलवर मिळाली. तत्काळ ते चुलत भावासोबत दुचाकीने अहिरे येथे पोहोचले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी बापू बोरसे हे खांबावर चढले असता अचानक तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. धक्क्याने ते खांबाला चिपकले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली; यावेळी हृदयद्रावक आक्रोश पाहायला मिळाला. त्यानंतर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी सायंकाळी चोपडा तालुक्यातील पारगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापू बोरसे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा असा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र दुःख व्यक्त केले जात असून, महावितरणने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व आवश्यक शासकीय लाभ मिळवून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर