राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर ठेवली जाते पाळत– सॅम पित्रोदा
नवी दिल्ली,25 डिसेंबर (हिं.स.) । लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला.
इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा


नवी दिल्ली,25 डिसेंबर (हिं.स.) । लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय.

इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला. दरम्यान यासंदर्भात पुरावा नसल्याचे देखील पित्रोदा यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात सॅम पित्रोदा की, राहुल गांधी परदेशात असताना भारतीय दूतावासातील अधिकारी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. हॉटेल, बैठक स्थळे तसेच विमानतळांवर सतत पाळत ठेवली जाते, असा दावा त्यांनी केला. याशिवाय, काही परदेशी नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घेऊ नये, असे सांगण्यात येते, असाही आरोप पित्रोदा यांनी केला.राहुल गांधी यांनी अलीकडेच जर्मनीचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारतातील लोकशाहीची स्थिती, संस्थांची स्वायत्तता आणि इतर राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली होती. मात्र, या दौऱ्याच्या वेळेबाबत भाजपाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, परदेश दौरे अचानक ठरत नाहीत, तर त्यांचे नियोजन अनेक महिन्यांपूर्वी केले जाते. जर्मनी दौऱ्याचा मुख्य उद्देश हा पुरोगामी आघाडीची आंतरराष्ट्रीय बैठक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत सुमारे 110 देशांतील पुरोगामी पक्ष सहभागी झाले होते.

परदेशात जाऊन राहुलनी भारतविरोधी वक्तव्ये केल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना पित्रोदा म्हणाले, आजच्या डिजिटल युगात देशात बोललेली प्रत्येक गोष्ट परदेशात पोहोचते आणि परदेशात बोललेली गोष्ट देशात येते. सत्य हे सत्यच असते, ते कुठेही मांडले तरी त्याचे स्वरूप बदलत नाही.काँग्रेसला देशातील संस्थांवर दबाव येत असल्याचे, माध्यमांकडून पक्षपात होत असल्याचे किंवा सिव्हिल सोसायटी कमकुवत केल्याचे वाटत असल्यास, ही बाब देशात आणि परदेशात मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान पाळत ठेवण्यात येत असल्याचे कोणतेही लेखी पुरावे नसल्याचे मान्य करताना, हा दावा वैयक्तिक अनुभवावर आधारित असल्याचे सॅम पित्रोदा यांनी सांगितले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande