अटलजींना १६ जानेवारीला खरी आदरांजली द्यायची आहे - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, २५ डिसेंबर (हिं.स.) : अटलजींनी ज्या प्रकारे मुंबईमध्ये भाजपाची सुरुवात करून दिली होती त्याचप्रमाणे, पुन्हा एकदा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अटलजींचे कार्य पुढे न्यायचे आहे. आपली लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. पारदर्शी आणि
अटल बिहारी वाजपेयी फडणवीस


अटल बिहारी वाजपेयी फडणवीस


मुंबई, २५ डिसेंबर (हिं.स.) : अटलजींनी ज्या प्रकारे मुंबईमध्ये भाजपाची सुरुवात करून दिली होती त्याचप्रमाणे, पुन्हा एकदा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अटलजींचे कार्य पुढे न्यायचे आहे. आपली लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. पारदर्शी आणि प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणूकीत उतरलो आहोत. आज तर आपण अटलजींना आदरांजली देतोच आहोत, पण १६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज संपूर्ण देशभरात श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा मुंबईच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 'चित्र-चरित्र प्रदर्शनी'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते वसंतस्मृती कार्यालय, दादर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर भाजपा महिला मोर्चाकडून औक्षण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत आदरांजली वाहिल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

फडणवीस पुढे म्हणाले, भारतमातेच्या या सुपुत्राने जवळपास ५ दशकांपर्यंत या देशाला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो नवभारत तयार केला. त्या नवभारताचा पाया रचणारे श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी होते. या भारतीय जनता पार्टीला त्यांनी विपरीत काळामध्ये दिशा दिली आणि हिंदुत्त्वाच्या संकल्पनेच्या व्यापक विचारांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण अटलजींनी परिभाषित केलं तेच धोरण आजही महत्त्वाचं मानलं जातं.

ते पुढे म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान म्हणून अटलजींनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय आहे. ते नेहमी म्हणायाचे 'रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात' आणि त्यांच्याच संकल्पनेतून देशाला वर्ल्डक्लास हायवे पाहायला मिळाले. त्यांनी पहिल्यांदा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना देशात सुरु केली. ज्यामुळे शहरे गावांशी जोडली गेली. भारत देश अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. मोठ्या राष्ट्रांकडून दबाव येत असताना अटलजी त्यांच्या निर्णायावर ठाम राहिले आणि आज भारत एक बलवान देश म्हणून उभा आहे. एवढंच नाही तर अटलजींच्या काळात देशाची अर्थव्यवस्था १० टक्क्यांपर्यंत वाढली. अणुस्फोटानंतर जगाने बहिष्कृत केलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ठामपणे उभं करणारे अटलजी होते.

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रास्ताविक भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मागच्या ११ वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला 'सुशासन' नेमकं काय असतं हे दाखवून दिलं आहे. मुंबईतील मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड आणि बीबीडी चाळीतील माणसाला ५६० चौरस फुटांचं घर ही सर्व कामे कोणी केली हे माहित आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने मागील ११ वर्षांत ज्या प्रमाणे काम केलं त्याने मुंबईकर प्रभावित झालेले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकताना दिसेल.

या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय सहसंगठन महामंत्री शिवप्रकाश, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. कालिदास कोळंबकर, आ. विद्या ठाकूर, राजहंस सिंह, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, श्वेता परुळकर आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande