सहकार क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय कै. 'राजे विक्रमसिंह घाटगे' सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार 'विलास' साखर कारखान्याला जाहीर
लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना (तोंडार, ता. उदगीर) या कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठीचा वसंतदादा शुगर इंन्टिटयुट, पुणे यांच्याकडून दिला जाणारा ''कै. राजे विक्रमसिंह
सहकार क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय कै. 'राजे विक्रमसिंह घाटगे' सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार 'विलास' साखर कारखान्याला जाहीर


लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।

मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना (तोंडार, ता. उदगीर) या कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठीचा वसंतदादा शुगर इंन्टिटयुट, पुणे यांच्याकडून दिला जाणारा 'कै. राजे विक्रमसिंह घाटगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार' विलास कारखान्याला जाहीर झाला आहे.

हा प्रतिष्ठित पुरस्कार श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल (जि. कोल्हापूर) यांनी पुरस्कृत केला असून, तांत्रिक उत्कृष्टतेच्या जोरावर विलास कारखान्याने सहकार आणि साखर उदयोगात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. सदरील पुरस्कार कारखान्याच्या वतीने वसंतदादा शुगर इंन्टिटयुट, पुणे येथे सोमवार दि. २९ डिंसेबर २५ रोजी वार्षीक सर्वसाधारण सभेत प्रदान करण्यात येणार आहे.

तांत्रिक उत्कृष्टतेची 'विलास' मोहोर

राज्यातील साखर कारखानदारीतील तांत्रिक कार्यक्षमतेचे मूल्यमापन करून हा पुरस्कार दिला जातो. विलास कारखान्याने गेल्या हंगामात केलेली कामगिरी सरस ठरली आहे. या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी साखर कारखान्याची निवड केली आहे. विलास कारखान्याने शून्य टक्के ब्रेकडाऊन, तांत्रिक (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) कारणास्तव कारखाना बंद राहण्याचे प्रमाण ०.०% राहिले आहे, जे अत्यंत उल्लेखनीय आहे. कारखान्याने १२.००% इतका दर्जेदार साखर उतारा मिळवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये १०.७४% ची वाढ झाली आहे. साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर केवळ ३७.२६% (प्रति ऊस) इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक ८५.२२% तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन (RME) ९६.४७% राखले आहे. गत गळीत हंगामातील ही विलास कारखान्याची कामगिरी महत्वाची ठरली आहे. या कामाचे कौतुक करुन सहकार क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय कै. 'राजे विक्रमसिंह घाटगे' सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार 'विलास' साखर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. या मानाच्या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्क्म असे आहे.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना प्रगतीपथावर आहे. संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या कुशल नेतृत्वामुळेच उदगीर, जळकोट, अहमदपूर,चाकूर आणि शिरुरअनंतपाळ या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न सुटला असून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले आहे.

या यशाबद्दल सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशालीताई देशमुख यांनी कारखान्याचे व्हा. चेअरमन, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक ए.आर.पवार, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर आणि वाहतूक कंत्राटदार या सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

----

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande