
वॉशिंग्टन , 26 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेने उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये आयएसआयएसच्या दहशतवादी तळांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहेत. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की ही कारवाई त्यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. ट्रम्प यांच्या मते, ही कारवाई त्या दहशतवाद्यांविरोधात होती, जे कथितपणे ख्रिश्चन नागरिकांची निर्दय हत्या करत होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेने उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधात एक “घातक” हल्ला केला. ट्रम्प म्हणाले,“आज रात्री, कमांडर-इन-चीफ म्हणून माझ्या आदेशानुसार, अमेरिकेने उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये आयएसआयएस च्या दहशतवादी गुंडांविरोधात एक शक्तिशाली आणि घातक हल्ला केला. हे दहशतवादी प्रामुख्याने निष्पाप ख्रिश्चन नागरिकांना लक्ष्य करत होते आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करत होते—अशी भीषणता अनेक वर्षे, अगदी शतकांमध्येही पाहिली गेली नव्हती. मी यापूर्वीच या दहशतवाद्यांना इशारा दिला होता की त्यांनी ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, आणि आज रात्री तसेच झाले.”
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले, “युद्ध विभागाने अनेक अचूक हल्ले केले, जे फक्त अमेरिका करू शकते. माझ्या नेतृत्वाखाली, आमचा देश कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाला पसरू देणार नाही. देव आमच्या सैन्याला आशीर्वाद देवो, आणि सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा—यामध्ये ठार झालेले दहशतवादीही समाविष्ट आहेत. जर त्यांनी ख्रिश्चनांचा नरसंहार सुरू ठेवला, तर असे आणखी अनेक दहशतवादी मारले जातील.”
अमेरिकेच्या नॅशनल काउंटरटेररिझम सेंटरनुसार, आयएसआयएस–वेस्ट आफ्रिका (आयएसआयएस-डब्ल्यूए) या संघटनेची स्थापना 2015 मध्ये झाली होती, जेव्हा बोको हरामने आयएसआयएस प्रति निष्ठा जाहीर केली. ही संघटना प्रादेशिक लष्करी तळ, सरकारी कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि विशेषतः ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करत आली आहे. याआधी, 19 डिसेंबर रोजी अमेरिका आणि जॉर्डनच्या सैन्याने सीरियामध्ये आयएसआयएस विरोधात मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले होते. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, या कारवाईत 100 हून अधिक अचूक शस्त्रांचा वापर करून 70 पेक्षा जास्त ISIS ठिकाणांवर हल्ले करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode