युएईचे अध्यक्ष पाकिस्तानात दाखल; पंतप्रधान शाहबाज यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा
इस्लामाबाद, 26 डिसेंबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान शुक्रवारी पाकिस्तानच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौर्‍यावर इस्लामाबाद येथे पोहोचले. हा दौरा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निमंत्रणावर होत आ
युएईचे अध्यक्ष पाकिस्तानात दाखल; पंतप्रधान शाहबाज यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा


इस्लामाबाद, 26 डिसेंबर (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान शुक्रवारी पाकिस्तानच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौर्‍यावर इस्लामाबाद येथे पोहोचले. हा दौरा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निमंत्रणावर होत आहे. दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासूनचे बंधुत्वाचे आणि सहकार्याचे संबंध लक्षात घेता, हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

यूएई राष्ट्राध्यक्षांचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत दाखल होताच पाकिस्तान वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी त्याला हवाई सलामी दिली. नूर खान एअरबेसवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वतः त्यांचे स्वागत केले. शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान यापूर्वी जानेवारी महिन्यात खासगी दौर्‍यावर पाकिस्तानला आले होते, मात्र यूएईचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ही त्यांची पहिली अधिकृत भेट आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानुसार, यूएई राष्ट्राध्यक्षांसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले आहे. या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान शहबाज शरीफ आणि यूएई राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, त्यात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, विकास तसेच प्रादेशिक स्थैर्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल.

या बैठकीत पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संपूर्ण द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाईल. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हा दौरा दोन्ही देशांमधील जुने आणि भक्कम संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे.

पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दीर्घकाळापासून मजबूत आहेत. यूएई हा पाकिस्तानचा एक प्रमुख व्यापारी भागीदार असून, मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक तेथे काम करतात. त्यांच्याकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर रेमिटन्स मिळते. संरक्षण, ऊर्जा आणि गुंतवणूक या क्षेत्रांतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य आहे, तसेच यूएई वेळोवेळी पाकिस्तानला आर्थिक आणि मानवीय मदत देत आले आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तान आणि यूएई यांच्यात अनेक सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या करारांचा उद्देश दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध अधिक दृढ करणे हा होता. सध्याचा हा दौरा त्या करारांना पुढे नेण्यासह सहकार्याच्या नव्या शक्यता उघडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande