
सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)राज्यातील २९ मनपाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सोलापूरचा देखील समावेश आहे. मात्र, येथील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून तिकीट जाहीर केलेल्या महिला उमेदवाराने चक्क पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे. यात एक माजी महापौर, शहराध्यक्ष यांच्यासह नऊ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र यातील एका महिला उमेदवाराने तिकीट मिळाल्यानंतर थेट काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका फिरदोस पटेल असं या महिला उमेदवाराचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने त्यांना सोलापुरातील प्रभाग 16 मधून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, पटेल यांनी अचानक काँग्रेसमधून बाहेर पडत एमआयएममध्ये प्रवेश केला. फिरदोस पटेल या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. काँग्रेसने मुलाखत घेताना अपमानस्पद वागणूक दिली, असा आरोप त्यांनी केला आहे.यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, ''काँग्रेसनं उमेदवारी दिली, पण आपल्या निष्ठेवरती प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे काँग्रेसपेक्षा एमआयएम पक्ष चांगला ठरेल. काँग्रेसला सोडण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्याच फायद्यासाठी घेतल्याचंही फिरदोस पटेल यांनी सांगितलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड