
सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि प्रवीण निकाळजे दोन्ही नेते एकत्र चर्चा सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक राजकीय घडामोडी शहरात घडत आहेत. अनेक कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन युती करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या सोलापुरात काँग्रेसच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक लढवत आहेत. असे असताना एकनाथ शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि काँग्रेसचे नगरसेवक, कुमठा नाका परिसरातील आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे हे दोन्ही नेते एकत्र चर्चा करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.प्रभाग क्रमांक 20 मध्ये यापूर्वी निवडून आलेले निकाळजे हे आता प्रभाग तुटल्याने आणि प्रभाग क्रमांक 21 हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने ते स्वतः ऐवजी आपल्या कन्येला या प्रभागातून काँग्रेस तर्फे उभी करत आहेत. मनीष काळजे हे सुद्धा प्रभाग 21 मध्येच राहतात त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड