
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। जॉर्जिया देशातील ग्रीगोल रोबाकीजे विद्यापीठ व पीनेओ मेडिकल इकोसिस्टीम हॉस्पिटल तसेच परभणी येथील डॉ. प्रफुल्ल पाटील वैद्यकीय शैक्षणिक व आरोग्यसेवा समूह यांच्यात शैक्षणिक, वैज्ञानिक, वैद्यकीय व व्यावसायिक देवाण-घेवाणीसाठी महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आहे. या करारामुळे मराठवाडा विभागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात नवी ओळख मिळणार आहे.
या आंतरराष्ट्रीय करारासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील (एम.डी.), सचिव डॉ. विद्या पाटील (एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.), संचालिका डॉ. जान्हवी पाटील (एम.बी.बी.एस., एम.बी.ए. - बिट्स पिलानी) तसेच संचालिका डॉ. तरल पाटील (एम.डी. - रेडिओलॉजी) यांनी जॉर्जिया येथील ग्रीगोल रोबाकीजे विद्यापीठ व पीनेओ मेडिकल इकोसिस्टीम हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर चर्चा केली व हा करार अंतिम केला.
या कराराअंतर्गत डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. प्रफुल्ल पाटील नर्सिंग कॉलेज, डॉ. प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल, डॉ. प्रफुल्ल पाटील दंत महाविद्यालय, डॉ. प्रफुल्ल पाटील फिजिओथेरपी हॉस्पिटल, डॉ. प्रफुल्ल पाटील कॉलेज ऑफ बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज तसेच हॉटेल फर्न रेसिडेन्सी या सर्व संस्थांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज कोलॅबोरेशनमुळे परभणी व जॉर्जिया येथील विद्यापीठे व रुग्णालये यांच्यात शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांची थेट देवाण-घेवाण होणार आहे.
पाश्चात्य देशांमध्ये आहारपद्धतीमुळे दात किडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. परिणामी कमी वयातच डेंटल इम्प्लांट तसेच फुल माऊथ रिहॅबिलिटेशनसारख्या उपचारांची गरज भासते. मात्र या उपचारांचा खर्च भारताच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये सुमारे 20 ते 25 पट अधिक असल्याने तेथील रुग्णांसाठी हे उपचार अत्यंत महागडे ठरतात.
यामुळे अनेक पाश्चात्य देशांतील रुग्ण दंत व इतर वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणे अधिक परवडणारे मानतात. या उपचार प्रवाहालाच मेडिकल टुरिझम व डेंटल टुरिझम असे संबोधले जाते. या करारामुळे परभणी येथील दंत महाविद्यालय, डॉ. प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच डॉ. प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जॉर्जिया तसेच इतर पाश्चात्य देशांतील रुग्णांना अत्याधुनिक, दर्जेदार व किफायतशीर उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या करारामुळे जॉर्जिया देशातील विद्यार्थी व रुग्ण परभणीत येऊन शिक्षण व उपचारांचा लाभ घेऊ शकतील. तसेच भारतीय डॉक्टर व विद्यार्थी जॉर्जिया देशातील विद्यापीठे व रुग्णालयांमध्ये जाऊन अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन व आधुनिक वैद्यकीय पद्धतींचा अभ्यास करू शकतील. त्यामुळे दोन्ही देशांतील संस्थांना परस्पर लाभ होणार असून स्थानिक कौशल्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे. या आंतरराष्ट्रीय अकॅडमिक व क्लिनिकल देवाण-घेवाण योजनेचे प्रसाद कमलाकर हे मुख्य समन्वयक आहेत.
जागतिकीकरणाच्या युगात मराठवाड्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरणार असून, परभणी शहर मेडिकल व डेंटल टुरिझमच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis