
सोलापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)यंदाच्या पावसाळ्यात उजनीतून ११२ टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडून द्यावे लागले. आता पावसाळा संपून अडीच महिने झाले आहेत. सध्या उजनी धरण १०० टक्के भरलेले असून धरणात सध्या ११७ टीएमसी पाणी आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी १५ जानेवारीनंतर रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन सोडले जाणार आहे.सोलापूर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे. याशिवाय ग्रामीणमधील १०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती, कर्जत-जामखेड, धाराशिव, इंदापूर अशा शहरांसह एमआयडीसी, साखर कारखान्यांना देखील उजनीचाच आधार आहे. उजनी धरणाचे पाणी सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एक लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्राला मिळते.आगामी वर्षांत जिल्ह्यातील एकरुख, शिरापूर, आष्टी, बार्शी व मंगळवेढा या उपसा सिंचन योजना पूर्ण होणार आहेत. त्या माध्यमातून जिल्ह्यातील एक लाख १२ हजार हेक्टर क्षेत्राला देखील पाणी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड