खोपोलित दुचाकींची धडक; अल्पवयीन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास डी.पी. रोडवरील सेंट मेरी हायस्कूल समोर भीषण अपघाताची घटना घडली आहे. परवाना नसताना भरधाव व बेदरकारप
खोपोलित दुचाकींची धडक; अल्पवयीन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास डी.पी. रोडवरील सेंट मेरी हायस्कूल समोर भीषण अपघाताची घटना घडली आहे. परवाना नसताना भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या विधीसंघर्षित बालकामुळे हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ता. खालापूर येथील एक विधीसंघर्षित बालक त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH 26 BU 0479 ही कोणताही वाहन चालविण्याचा परवाना नसताना अतिवेगाने, अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत होता. यावेळी त्याने फिर्यादीच्या मित्राच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH 09 FT 1532 ला जोरदार धडक दिली.

या अपघातात विधीसंघर्षित चालकाला किरकोळ दुखापती झाल्या असून, फिर्यादीच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात दोन्ही दुचाकींना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६७/२०२५ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम २८१, १२५ (A) व १२५ (B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधीसंघर्षित बालकाकडून वारंवार होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे गंभीर अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे दुचाकी देताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास मोटार पोलीस हवालदार वैदही सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande