खोपोलीत महिलेची सोन्याची साखळी हिसकली
रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास भरवस्तीत चैनस्नॅचिंगची घटना घडली आहे. जळगावकर यांच्या बिल्डींगजवळील
भरधाव मोटारसायकलवरून येत महिलेला लक्ष्य; खोपोलीत ६३ हजारांची लूट


रायगड, 29 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास भरवस्तीत चैनस्नॅचिंगची घटना घडली आहे. जळगावकर यांच्या बिल्डींगजवळील अदीरा मॅनेजमेंट या दुकानासमोर दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येत महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पलायन केले. या घटनेत सुमारे ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी या सायंकाळच्या सुमारास जळगावकर यांच्या बिल्डींगजवळील अदीरा मॅनेजमेंट दुकानासमोर आल्या असता, जैन मंदिराच्या बाजूकडून दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून भरधाव वेगात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन लबाडीच्या हेतूने हिसकावून घेतली आणि मोटारसायकलवरून वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर महिलेने तत्काळ खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०४-३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, वाढत्या चोरी व चैनस्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीच्या वेळी विशेष गस्त वाढवावी तसेच महिलांनीही खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande