मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
* दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे आणि राजेश माळकर पुरस्काराचे मानकरी मुंबई, 29 डिसेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगस
तुळशीदास भोईटे


सचिन लुंगसे


अविनाश कोल्हे


अशोक अडसूळ


* दिलीप ठाकूर, तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे आणि राजेश माळकर पुरस्काराचे मानकरी

मुंबई, 29 डिसेंबर (हिं.स.) : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे, अशोक अडसूळ, सचिन लुंगसे, विवेक दिवाकर, अविनाश कोल्हे आणि राजेश माळकर यांची यंदाच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनी ६ जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. रोख रुपये दहा हजार, गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा ज्येष्ठ पत्रकार लेखक पी. साईनाथ यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता पत्रकार संघाच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहीती संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण यांनी दिली.

यंदा पहिल्यांदाच सिनेपत्रकार आणि व्हिडीओ जर्नालिस्टसाठी संघातर्फे पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठी शिरीष कणेकर यांच्या पत्नी भारती कणेकर यांनी दिलेल्या देणगीतून पुरस्कार देण्यात आला असून या पहिल्या शिरीष कणेकर स्मृती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर ठरले आहेत.

तसेच व्हिडिओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) कै. वैभव कनगुटकर यांच्या स्मृती जपण्यासाठी उद्योगपती राजू रावल यांच्या देणगीतून वैभव कनगुटकर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ व्हिडीओ जर्नालिस्ट राजेश माळकर ठरले आहेत.

जयहिंद प्रकाशनातर्फे वर्षातील सर्वोत्तम पुस्तकासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संपादक तुळशीदास भोईटे यांच्या ‘२०२४, भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.

उत्कृष्ठ राजकीय बातम्यांसाठी देण्यात येणारा रमेश भोगटे स्मृती पुरस्कार लोकसत्ताचे अशोक अडसूळ यांना, तर आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार लोकमतच्या सचिन लुंगसे यांना जाहीर झाला आहे. कॉ. तु.कृ. सरमळकर पुरस्कार नवराष्ट्रच्या विवेक दिवाकर यांना, तर ललित लेखनासाठीचा विद्याधर गोखले पुरस्कार अविनाश कोल्हे यांना जाहिर झाला आहे.

या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश बिडवई, अजय कौतिकवार, अभिजित मुळ्ये आणि समीर चवरकर यांच्या निवड समितीने काम पाहिले.

येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी होणार्‍या पत्रकार दिन सोहळ्यात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही होणार आहे. यावेळी या दिनदर्शिकेसाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे कार्यवाह श्री. शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.

पुरस्कार पुढीलप्रमाणे :

पुरस्कारांचा तपशील

१. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री. सचिन अंकुश लुंगसे, लोकमत

२. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्‍या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणार्‍या पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक : श्री. तुळशीदास भोईटे, ज्येष्ठ पत्रकार

३. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार : श्री. विवेक शंकर दिवाकर, नवराष्ट्र

४. विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार : श्री. अविनाश कोल्हे, मुक्त पत्रकार

५. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार : श्री. अशोक नागनाथ अडसूळ, लोकसत्ता

६. शिरीष कणेकर स्मृती पुरस्कार : सिनेमा व मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सिनेपत्रकारासाठीचा पुरस्कार : श्री. दिलीप अनंत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार

७. वैभव कनगुटकर स्मृती वृत्तवाहिनी व्हिडीओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) पुरस्कार : इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्‍या वरिष्ठ वृत्तवाहिनी व्हिडीओ जर्नालिस्ट (कॅमेरामन) साठीचा पुरस्कार : श्री. राजेश माळकर, ज्येष्ठ व्हिडीओ जर्नालिस्ट

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande