
रायपूर, 3 डिसेंबर (हिं.स.)भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला जात आहे. या मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. पण टॉस जिंकण्यामध्ये त्यांचे नशीब सुधारलेले नाही. भारताने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमावली आहे. त्याचप्रमाणे भारतीने सलग २0 वेळा एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली आहे. अहमदाबादमध्ये २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यापासून भारताने सलग २० वेळा नाणेफेक गमावली आहे. गणितीयदृष्ट्या, सलग २० नाणेफेक गमावण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, अंदाजे दहा लाखांमध्ये एक (१,०४८,५७६ पैकी १). याचा अर्थ संभाव्यता ०.००००००९५ टक्के आहे.
या काळात सलग नाणेफेक गमावल्याने भारताला फारसे नुकसान झालेले नाही. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासून, भारताने त्यांच्या १९ पूर्ण झालेल्या एकदिवसीय सामन्यांपैकी ६३ टक्के सामने जिंकले आहेत. याचा अर्थ असा की, गेल्या सलग १९ सामन्यांमध्ये भारताने नाणेफेक गमावली, त्यापैकी १२ सामने जिंकले. केवळ सहा सामने गमावले आणि एक बरोबरीत सुटला. याचा अर्थ असा की, नाणेफेक गमावल्याने भारताचे फारसे नुकसान झाले नाही. या काळात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली होती.
एकदिवसीय सामन्यात शेवटचा नाणेफेकीचा कौल १५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या बाजूने लागला होता. जेव्हा २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडला होता.
टॉसच्या वेळी उपस्थित असलेल्या रवी शास्त्री यांनी राहुलला टॉसच्या वेळी भारताच्या दुर्दैवाबद्दल विचारले तेव्हा भारतीय कर्णधार म्हणाला की, त्याच्यासाठी सर्वात मोठा दबाव टॉस जिंकण्याचा होता आणि तो सामन्यापूर्वी त्याचा सराव करत होता. राहुल म्हणाला, मला वाटते की, आजचा सर्वात मोठा दबाव टॉसचा होता. आम्ही बऱ्याच दिवसांपासून एकही सामना जिंकलेला नाही, म्हणून मी नाणे टॉसचा सराव करत आहे. पण स्पष्टपणे ते अजूनही काम करत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे