
इस्लामाबाद , 3 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या बहिणी अलीमा खान यांनी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आसिम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलीमा खान यांनी आसिम मुनीर यांना कट्टरपंथी इस्लामवादी आणि इस्लामिक रूढीवादी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आसिम मुनीर भारताशी युद्ध करण्यासाठी “तळमळत” आहेत, तर इमरान खान यांनी नेहमीच भारतासोबत संबंध सुधारण्याचा आणि मैत्री करण्याचा प्रयत्न केला.
अलीमा खान यांनी टीव्ही चॅनेलच्या एका मुलाखतीत भारत–पाकिस्तानमधील मे महिन्यात झालेल्या संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी आर्मी चीफवर थेट निशाणा साधला. अलीमा म्हणाल्या “आसिम मुनीर कट्टरपंथी इस्लामवादी आहेत. त्यांची रूढीवादी विचारसरणी त्यांना भारताविरुद्ध युद्धासाठी प्रवृत्त करते. इमरान खान सत्तेत आले की ते भारतासह अगदी भाजपसोबतही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण जर इस्लामिक रूढीवादी आसिम मुनीर सत्ता हातात घेतात, तर ते भारताशी युद्ध करणारच. फक्त भारतच नाही, तर त्याचे सहयोगी देशही बाधित होतील.” यावेळी त्यांनी पाश्चिमात्य देशांना आवाहन केले की इमरान खान यांची सुटका करण्यात त्यांनी मदत करावी.
दरम्यान, ऑगस्ट 2023 पासून इमरान खान रावळपिंडीच्या आदीयाला तुरुंगात बंद आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु 2 डिसेंबरला बहिण उजमा खान यांनी त्यांची भेट घेऊन स्पष्ट केले की ते शारीरिकदृष्ट्या ठीक आहेत, मात्र मानसिक छळ अत्यंत गंभीर आहे.इमरान खान यांनी आसिम मुनीर यांच्यावर तुरुंगात “प्राण्यांपेक्षा वाईट वागणूक” देण्याचे आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांना अशा परिस्थितीत ठेवले आहे ज्या ठिकाणी साधारणपणे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवले जाते.
दोघांमधील संघर्ष 2019 पासून आहे. त्यावेळी इमरान खान पंतप्रधान होते आणि आसिम मुनीर आयएसआय प्रमुख. आसिम मुनीर यांनी इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर इमरान खान यांनी फक्त 8 महिन्यांत त्यांना पदावरून हटवले, जरी त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. इमरान खान यांनी बुशरा बीबीवरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode