
अमरावती, 30 डिसेंबर, (हिं.स.)। राज्यात महायुतीचे सरकार असले, जरी अमरावती महापालिकेत मात्र भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युतीची बोलणी शेवटच्या क्षणी फिस्कटली आणि शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेल मेहफिल इन येथे मोठी गर्दी केली होती. तिकीट वाटपाच्या वेळी निष्ठावंताना डावलून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करीत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
मंगळवारी सकाळपासून अमरावतीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी युती तुटल्याचे जाहीर केले, तर शिंदे गटाचे नेते माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता हे शिंदे गटातून बाहेर पडले. आपल्याला दिलेले वचन पाळले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, हॉटेल मेहफिल येथे तिकीट वाटपाच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. निष्ठावंतांना डावलून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर काही जणांनी या संतप्त कार्यकर्त्यांना शांत केले.
शिवसेना शिंदे गटात इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत भाजपने कमी जागा देऊ केल्या होत्या. तरीही मतविभाजन टाळण्यासाठी शिंदे गटाने प्रस्ताव मान्य केला होता, पण हक्काच्या जागा बदलण्यात आल्याने शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली. रात्रभरातून या जागा बदलण्यात आल्याचा आणि यात युवा स्वाभिमान पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्पत्यामधील राजकीय संघर्ष जुना आहे. तो आता पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.उमेदवारी वाटपातील गोंधळ आणि अंतर्गत असंतोषामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर अडचणी वाढल्याचे चित्र असून, या घडामोडींचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी