रायगड - ६६० मतदान केंद्रांसाठी ७२५ पथके सज्ज; ४२०५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
रायगड, 30 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेची आगामी निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल आणि नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात एकूण ४२०५
725 teams ready for 660 polling stations; 4205 employees trained


रायगड, 30 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेची आगामी निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल आणि नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात एकूण ४२०५ अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असून, निवडणूक यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पनवेल महापालिकेतील २० प्रभागनिहाय क्षेत्रांसाठी एकूण ६६० मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी सहा निवडणूक निर्णय अधिकारी, ६८ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी, शिपाई तसेच ६५ राखीव मतदान केंद्रांसाठी सुसज्ज अशी एकूण ७२५ मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या सर्व यंत्रणेला एकसंधपणे काम करता यावे, यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेत पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, आचारसंहितेचे काटेकोर पालन, मतदान व मतमोजणीची प्रक्रिया, कायदेशीर बाबी, ई.व्ही.एम. मशिनचे प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन संभाव्य अडचणींवर उपाय सुचवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत माहिती देताना आयुक्त तथा निवडणूक मुख्य अधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले की, “निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हाच या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.” प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात आली असून उपस्थिती बंधनकारक आहे.

प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande