बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, १५ दिवसात तिसरी घटना
ढाका, 30 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मयमनसिंह जिल्ह्यात घडली असून, गेल्या 15 दिवसांत बांगलादेशमध्ये हिंदू युवकांच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. मयमनसिंह जिल्ह्यातील रहिवासी बृजेंद
बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, १५ दिवसात तिसरी घटना


ढाका, 30 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मयमनसिंह जिल्ह्यात घडली असून, गेल्या 15 दिवसांत बांगलादेशमध्ये हिंदू युवकांच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. मयमनसिंह जिल्ह्यातील रहिवासी बृजेंद्र बिस्वास यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बृजेंद्र बिस्वास हे बांगलादेशच्या ग्रामीण अर्धसैनिक दलाचे (अंसार) सदस्य होते.

बांगलादेशी माध्यमांच्या माहितीनुसार, भालुका उपजिल्ह्यातील मेहराबारी परिसरात सुल्ताना स्वेटर्स लिमिटेड ही कारखाना आहे. या कारखान्याच्या सुरक्षेसाठी 20 अंसार सदस्य तैनात करण्यात आले होते, त्यामध्ये बृजेंद्र बिस्वास यांचाही समावेश होता.सोमवारी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता, बृजेंद्र बिस्वास हे आपल्या सहकारी नोमान मियां याच्यासोबत बसले असताना नोमानने त्यांच्यावर आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी थेट बृजेंद्र यांच्या डाव्या मांडीवर लागली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लबीब ग्रुपचे प्रभारी अंसार सदस्य एपीसी मोहम्मद अझहर अली यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी दोघांमध्ये कोणताही वाद झाला नव्हता. ते म्हणाले की, सर्वजण एका खोलीत बसले होते. अचानक नोमानने आपली शॉटगन बृजेंद्र यांच्या मांडीकडे रोखली आणि “मी गोळी मारेन,” असे ओरडत ट्रिगर दाबला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपी नोमान मियां याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मयमनसिंह जिल्ह्यातच काही दिवसांपूर्वी दीपू चंद्र दास नावाच्या हिंदू युवकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते आणि नंतर त्याला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. यापूर्वी ढाक्यात अमृत मंडल यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप लावण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande