
ढाका , 30 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) यांच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी ढाक्यात दीर्घ आजारानंतर वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने जाहीर केले आहे की बुधवारी त्यांना अंतिम निरोप दिला जाईल आणि पूर्ण राजकीय सन्मानाने त्यांचे दफन त्यांच्या पती, बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि बीएनपीचे संस्थापक झियाउर रहमान यांच्या शेजारी करण्यात येईल. याचसोबत देशाच्या राजकारणातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक आणि एक दिवसाची सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे.
मंगळवारी बोलताना यूनुस यांनी सांगितले की, खालिदा झिया यांचे पार्थिव बुधवारी सुपुर्द-ए-खाक करण्यात येईल. त्यासोबतच देशभरात तीन दिवसांचा राजकीय शोक आणि एका दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.शोककालावधीत सर्व सरकारी, निमसरकारी आणि स्वायत्त संस्था, शैक्षणिक संस्था, सरकारी व खासगी इमारती तसेच परदेशातील बांगलादेशी दूतावासांवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर बुधवारी खालिदा झिया यांच्या सन्मानार्थ देशभरातील मशिदींमध्ये विशेष दुआ केली जाणार आहे. तसेच इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळांवरही विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातील. याशिवाय, परदेशातील बांगलादेशी दूतावासांमध्ये शोक पुस्तिका खुल्या केल्या जातील.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या दूरदर्शन भाषणात मोहम्मद यूनुस यांनी नागरिकांना आवाहन केले की, अंत्यसंस्कार आणि शोककाळात शांतता, शिस्त आणि सुव्यवस्था राखावी. हा काळ संयम राखण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, यावरही त्यांनी भर दिला.
याआधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने मंगळवार, 30 डिसेंबर 2025 पासून सात दिवसांचा अधिकृत शोक जाहीर केला आहे. या संदर्भात बीएनपीचे वरिष्ठ संयुक्त महासचिव रुहुल कबीर रिजवी यांनी पत्रकार परिषदेत शोक कार्यक्रमांची माहिती दिली. त्याअंतर्गत, पक्षाचे नयापल्टन येथील केंद्रीय कार्यालय तसेच देशभरातील सर्व पक्ष कार्यालयांवर काळे झेंडे फडकवले जातील. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक काळे बॅज परिधान करतील. तसेच पक्ष कार्यालये आणि इतर ठिकाणी दुआ महफिल आणि कुराण पठणाचे आयोजन करण्यात येईल. सामान्य नागरिकांना आणि पक्ष सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी मिळावी यासाठी बीएनपीचे केंद्रीय कार्यालय, ढाक्यातील गुलशन कार्यालय आणि जिल्हा कार्यालयांमध्ये संवेदना पुस्तिका खुल्या करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode