
वॉशिंग्टन , 30 डिसेंबर (हिं.स.)।रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठा ड्रोन हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या आरोपानंतर ट्रम्प यांची तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प म्हणाले, “हे चांगले नाही. यामुळे मला खूप राग आला आहे.”
पुतिन यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्यावर ट्रम्प म्हणाले, “पुतिन यांनी मला सांगितले की त्यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे मला खूप राग आला आहे. मला हे अजिबात आवडले नाही. हा अतिशय नाजूक काळ आहे आणि कोणत्याही नेत्याच्या घरावर हल्ला करणे योग्य नाही.” ट्रम्प यांनी पुढे असेही नमूद केले की, कदाचित प्रत्यक्षात हल्ला झाला नसेल, मात्र पुतिन यांनी त्यांना तसे सांगितले आहे. व्हाइट हाऊसने पुतिन यांच्याकडून आलेल्या या फोन कॉलला “सकारात्मक” असे वर्णन केले आहे.
रशियाने आरोप केला आहे की, युक्रेनने उत्तर-पश्चिम रशियातील नोवगोरोड प्रदेशात असलेल्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सरकारी निवासस्थानी (वाल्डाई किंवा डोल्गिये बोराडी रेसिडेन्स) लांब पल्ल्याच्या 91 ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, रशियन हवाई संरक्षण प्रणालीने सर्व ड्रोन पाडले असून कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाली नाही.
लावरोव यांनी या घटनेला “राज्यप्रायोजित दहशतवाद” असे संबोधले आणि अशा कृतींना योग्य उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला. तसेच शांतता चर्चांबाबत रशिया आपली भूमिका पुन्हा तपासून पाहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.हा आरोप अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रविवारी ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात फ्लोरिडामध्ये बैठक झाली होती, ज्यामध्ये शांतता करारावर प्रगती झाल्याचे सांगण्यात आले
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचा हा आरोप “पूर्णपणे खोटा आणि मनघडंत” असल्याचे म्हटले आहे. रशिया हा दावा शांतता चर्चांना उधळून लावण्यासाठी आणि कीववर पुढील हल्ल्यांचे समर्थन मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही हे आरोप “खोटा” असल्याचे सांगितले आणि युक्रेन केवळ वैध लष्करी लक्ष्यांवरच हल्ले करत असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेनंतर रशियाने म्हटले आहे की, तो शांतता चर्चांपासून माघार घेणार नाही, मात्र आपली भूमिका अधिक कठोर करेल. त्यामुळे ही घटना युक्रेन युद्धातील शांतता प्रयत्नांना धक्का देऊ शकते, जे ट्रम्प प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode