
रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतूक ठप्प; ऑरेंज अलर्ट जारी
नवी दिल्ली, 30 डिसेंबर (हिं.स.)। उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये सोमवारी दाट धुके आणि तीव्र थंडीने जनजीवन विस्कळीत झाले. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू, मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये धुक्यामुळे रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दृश्यमानता प्रचंड घटल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) धुक्याचा सर्वाधिक फटका बसला. धावपट्टीवरील दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी झाल्यामुळे एकूण 128 उड्डाणे रद्द करण्यात आली, तर 300 हून अधिक उड्डाणे अर्धा तास ते चार तासांपर्यंत विलंबित झाली. दिल्लीला येणारी आठ उड्डाणे जयपूर, अहमदाबाद आणि लखनऊकडे वळवावी लागली. अत्याधुनिक कॅट-3 प्रणाली उपलब्ध असतानाही सुरक्षेच्या कारणास्तव ही पावले उचलण्यात आली. यासोबतच रेल्वे सेवेलाही मोठा फटका बसला. दिल्ली आणि उत्तर भारतातील विविध स्थानकांवर 90 हून अधिक गाड्या दोन ते 15 तास उशिराने पोहोचल्या. राजधानी, शताब्दी, वंदे भारत, गतिमान यांसारख्या वेगवान गाड्यांनाही विलंबाचा सामना करावा लागला. जम्मू रेल्वे स्थानकावरही डझनभर गाड्या उशिराने पोहोचल्या.रस्ते वाहतुकीवर धुक्याचा गंभीर परिणाम झाला. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाजवळ ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात एका कॅंटर चालकाचा मृत्यू झाला. अनेक भागांमध्ये दृश्यमानता 50 ते 200 मीटरपर्यंत मर्यादित राहिल्याने वाहनचालकांना अत्यंत सावधपणे वाहन चालवावे लागत आहे.
उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्येही परिस्थिती गंभीर आहे. देहरादून, हरिद्वार आणि ऊधमसिंह नगर येथे हवाई, रेल्वे व बस सेवा प्रभावित झाल्या. ऊधमसिंह नगरमध्ये धुक्यामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. देहरादून विमानतळावरील आठ उड्डाणे उशिराने पोहोचली, तर पंतनगर विमानतळावरील दिल्लीहून येणारी 2 उड्डाणे रद्द करण्यात आली. मध्य प्रदेशातील ग्वालियर-चंबल विभागात थंड वाऱ्यांसह दाट धुक्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. येथे दृश्यमानता 200 मीटरपेक्षा कमी नोंदवली गेली असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
दरम्यान, दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 400 च्या पुढे गेला असून आनंद विहार परिसरात सर्वाधिक 455 एक्यूआय नोंदवण्यात आला. वारा न वाहिल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.भारतीय हवामान विभागाने पुढील 2 दिवस उत्तर भारतात मध्यम ते दाट धुके कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. धुके आणि थंडी 31 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढीच प्रवासाची योजना करावी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड