अधीर रंजन चौधरी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली, ३० डिसेंबर, (हिं.स.) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध राज्यांमध्ये, विशेषतः भाजपशासित राज्यांमध्ये बंगालमधील स्थलांतरित मजुरांवर होणाऱ्या कथित हल्ल्यांचा आणि छळाचा मुद्
अधीर रंजन चौधरी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट


नवी दिल्ली, ३० डिसेंबर, (हिं.स.) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध राज्यांमध्ये, विशेषतः भाजपशासित राज्यांमध्ये बंगालमधील स्थलांतरित मजुरांवर होणाऱ्या कथित हल्ल्यांचा आणि छळाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करणारे पत्र सादर केले.

बैठकीनंतर अधीर रंजन चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी पंतप्रधानांना विविध राज्यांमध्ये बंगाली भाषिक मजुरांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती दिली. ते म्हणाले की, ते सर्व भारतीय नागरिक आहेत आणि त्यांना देशात कुठेही प्रवास करण्याचा, राहण्याचा आणि काम करण्याचा संवैधानिक अधिकार आहे, परंतु ते बंगाली बोलतात म्हणूनच त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे.

काँग्रेस नेत्याने त्यांच्या पत्रात आरोप केला की, पश्चिम बंगालमधील स्थलांतरित मजुरांना अनेक राज्यांमध्ये भेदभाव, हिंसाचार, गैरवापर आणि हल्ले सहन करावे लागत आहेत. ते म्हणाले की अनेक प्रकरणांमध्ये, प्रशासन आणि पोलिस बंगाली भाषिक भारतीय नागरिक आणि बांगलादेशी घुसखोरांमध्ये फरक करू शकत नाहीत, ज्यामुळे निष्पाप लोकांना तुरुंगात किंवा डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जाते.

अधीर रंजन चौधरी यांनी ओडिशातील संबलपूर येथे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जुएल शेख या तरुणाच्या कथित लिंचिंगचा उल्लेख केला आणि ते अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले. पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कामगारांविरुद्ध होणारा भेदभाव, हिंसाचार आणि छळ रोखण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व राज्य सरकारांना संवेदनशील करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande