नाशिक - आयुक्त शेखर सिंहानी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी साधला संवाद
नाशिक, 30 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाविषयी जनजागृतीसाठी साहित्य, कला, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. तसेच 2027 मध्ये होणारे 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होण्य
आयुक्त शेखर सिंहानी विविध क्षेत्रातील


नाशिक, 30 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाविषयी जनजागृतीसाठी साहित्य, कला, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. तसेच 2027 मध्ये होणारे 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळा आणि 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुंभमेळा या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्याबाबत चर्चेसाठी आयुक्त श्री. सिंह यांनी आज दुपारी शहरातील शिक्षण, साहित्य, कला, पत्रकारिता आदी विषयातील तज्ञ यांच्यासमवेत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, साहित्यिक नरेश महाजन, मराठा समाज विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, रजिस्टार गिरीश नातू, सावानाचे सुरेश गायधनी, दैनिक देशदूत चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रकाश कडवे, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 12 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी प्रदीर्घ आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा इतिहास, महत्व, पुराणातील महत्व आणि या माध्यमातून परिसरातील पर्यावण संवर्धन, गोदावरी नदीचे पावित्र्य, स्वच्छता आणि संवर्धन यावर परिसंवाद, निबंध लेखन, चर्चासत्र आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. याबरोबरच कुंभमेळ्यातील सामाजिक समरसता, अध्यात्म आधुनिक जीवन याविषयावर लेखन स्पर्धेचे आयोजन करतानाच कुंभमेळ्यातील कलात्मक पैलू यांचा साहित्य क्षेत्राशी समन्वय साधत विविध उपक्रम राबवावेत. याशिवाय महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या थीमचा समावेश करावा, कुंभमेळा संबंधित साहित्य प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, कार्यशाळा आयोजित करीत कुंभमेळ्याच्या जनजागृतीत सहभाग नोंदवावा, असेही आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाबाबत विविध सूचना केल्या. या सूचनांची दखल कुंभमेळा नियोजनात घेण्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande