
नाशिक, 30 डिसेंबर, (हिं.स.)। शहरवासीयांच्या तक्रारींवर तातडीने आणि ठोस कारवाई करण्याच्या धोरणानुसार नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सिडको विभागात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्यक्ष क्षेत्रभेट दिली.
या पाहणीदरम्यान माऊली लॉन्स परिसरात रस्त्यावर हातगाड्या व फेरीवाल्यांमुळे झालेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार प्राप्त झाली होती. सदर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यावर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात आला.
तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित देखरेख व सतत निरीक्षण ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याच क्षेत्र भेटीदरम्यान सीमेन्स कॉलनीतील विजय सोसायटी परिसरात घनकचरा व्यवस्थापना संदर्भातील तक्रार देखील तपासण्यात आली. उघड्या जागेत साचलेला कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला.
नागरिकांना उघड्या जागेत कचरा टाकू नये, तसेच मनपाच्या कचरा संकलन व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संबंधित विभागांच्या अधिका-यांना तक्रारींची प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करूनच तत्काळ व प्रभावी निवारण प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आणि शहरातील स्वच्छता, वाहतूक व सार्वजनिक सुव्यवस्था राखणे ही नाशिक महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर व दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV