
कोलकाता, 30 डिसेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी राहील, असे स्पष्ट केले. मंगळवारी कोलकात्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर तीव्र टीका केली.
यावेळी अमित शाह म्हणाले की, निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी ममता बॅनर्जी सरकार बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देत आहे. राज्य सरकारकडून जमीन न दिल्यामुळे भारत–बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याचे काम अपूर्ण राहिले असून त्यामुळेच घुसखोरीची समस्या कायम आहे, असा आरोप त्यांनी केला.गेल्या 15 वर्षांत टीएमसी सरकारच्या काळात पश्चिम बंगालमध्ये भीती, भ्रष्टाचार आणि कुशासन वाढले असल्याचे शाह यांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे राज्याचा विकास थांबला असून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना टोल सिंडिकेटमध्ये अडकत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.इतर राज्यांच्या सीमांवर घुसखोरी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली असताना पश्चिम बंगालमध्ये ती का थांबत नाही, असा सवाल उपस्थित करत शाह यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. लोकसंख्येची रचना बदलून मतपेढी मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. बंगाल सीमेवरील घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भारत–बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सात वेळा पत्रे लिहिल्याची माहिती शाह यांनी दिली. तसेच गेल्या सहा वर्षांत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनेक बैठकांनंतरही राज्य सरकारने ठोस पावले उचललेली नसल्याचा आरोप केला. आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये दोन-तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त करत शाह यांनी भाजपच्या वाढत्या जनाधाराचा उल्लेख केला. निवडणूक निकालांमधून भाजपची ताकद सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर बंगालची संस्कृती, वारसा आणि विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन देत शाह यांनी गरीब कल्याण आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल, असेही सांगितले. घुसखोरी रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रभावी यंत्रणा उभारण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी