
तिरुवनंतपुरम, 30 डिसेंबर (हिं.स.)।मल्याळम सुपरस्टार आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित अभिनेते मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहनलाल यांच्या आई संथाकुमारी यांचे आज, 30 डिसेंबर रोजी, केरळमधील कोची येथे निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. संथाकुमारी यांचे निधन मोहनलाल यांच्या एलामक्कारा येथील निवासस्थानी झाले.
त्या काही काळापासून न्यूरोलॉजिकल (मज्जासंस्थेशी संबंधित) आजारांशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाची पुष्टी अमृता रुग्णालयातील डॉक्टरांनी केली असून, त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतानाही वय आणि आजारपणामुळे शरीराने अखेर साथ सोडली.
मोहनलाल यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात अनेकदा आईचा उल्लेख अत्यंत आदर आणि प्रेमाने केला आहे. ते संथाकुमारी यांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा मानत. करिअरमधील सुरुवातीचे संघर्ष असोत किंवा यशाच्या शिखरावरचे दिवस—प्रत्येक टप्प्यावर संथाकुमारी यांनी आपल्या मुलाला ठामपणे साथ दिली.अभिनेता अनेकदा मंचावरून हे मान्य करत आले आहेत की, आयुष्यात मिळालेले संस्कार, संतुलन आणि मूल्ये यांची मुळे त्यांच्या आईच्या शिकवणीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode