
कोल्हापूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। गावाच्या मातीमध्ये दडलेली सत्ता, अहंकार, सूड आणि संतापाची ज्वालामुखी उसळताना दाखवणारा जबरदस्त मराठी अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला हात दगड घट्ट पकडून उभा दिसतो आहे. हा दगड सूड, संताप आणि हिंसक संघर्षाचं प्रतीक वाटतो. साधी पार्श्वभूमी आणि लाल रंगातील धारदार शीर्षक चित्रपटाच्या कठोर, थरारक आणि सूडाने पेटलेल्या कथेला प्रभावीपणे दर्शवतं.
‘सुड शकारंभ’ सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी शोएब खतीब यांनी सांभाळली असून, त्यांनी एक तीव्र, वास्तवदर्शी आणि अंगावर काटा आणणारा सिनेमॅटिक अनुभव साकारला आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे सहयोगी निर्माता दत्तसंग्राम वासमकर यांनी मातीतला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या सिनेमात मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, अनिल राबाडे,ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने आणि मारुती केंगार यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून श्रीराज पाटील आणि चित्रपटाला संगीत व पार्श्वसंगीताची धग विकी वाघ आणि आर.तिरूमल यांनी दिली आहे. तर मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांच्या आवाजाने संगीत अधिक भावस्पर्शी झाले आहे. पॅनोरमा म्युझिकच्या लेबलअंतर्गत चित्रपटाचे संगीत प्रदर्शित होत असून, ग्रामीण राजकारणाच्या काळ्या-पांढऱ्या छटांना प्रभावीपणे टिपण्यासाठी छायाचित्रणाची धुरा रोहण पिंगळ आणि अमेय तानवडे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन रोहित रुकडे, कला दिग्दर्शन सोनाली घाडगे, यांनी सांभाळली आहे. सुड शकारंभ’ हा केवळ एक चित्रपट नसून, सत्तेच्या खेळात माणूस कसा बदलतो, नात्यांवर कुऱ्हाड कशी चालते आणि गावाच्या शांततेत कशी रक्तरंजित आग पेटते याचा थरारक आरसा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar