
मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)।मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा एका बसने 13 पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात 3 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला. 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सांगितले की, हा अपघात रात्री 9:35 वाजता बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या बसमुळे झाला.
प्राथमिक माहितीनुसार, बेस्टची बस रिव्हर्स घेताना अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना तिने धडक दिली. अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेनंतर रुग्णवाहिका, मुंबई अग्निशमन दल आणि बेस्टची टीम घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने राजावाडी आणि एम.टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 4 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसने एका विजेच्या खांबालाही धडक दिली, ज्यामुळे तो कोसळला. यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला.
डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, बस चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बसची यांत्रिक आणि तांत्रिक तपासणी केली जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. अपघातानंतर तात्काळ त्या गजबजलेल्या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. सकाळपर्यंत घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. अपघातस्थळ सील करण्यात आले असून, फॉरेन्सिक पथकाने तेथून नमुने गोळा केले. राजपूत यांनी आश्वासन दिले की, वाहनाची स्थिती आणि इतर सर्व बाबींची तपासणी केली जाईल; मात्र सध्या जखमींवर उपचार करणे हेच पोलिसांचे पहिले प्राधान्य आहे.
या घटनेबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ₹5 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode