
सोलापूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। जैव कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता सोलापूरकरांच्या जीवाशी खेळल्याने बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा महापालिकेने पाच वर्षांसाठी काळ्या यादीत समावेश केला. महापालिकेचे 40 लाखांचे नुकसान केल्याने ते वसुलीची नोटीस महापालिकेने बजावली. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अशा वादग्रस्त कंपनीस दिलेली नोटीस रद्द करण्याची लेखी शिफारस महापालिका प्रशासनास केली.
सोलापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीला ‘क्लिन चीट’ देण्याची शिफारस करणाऱ्या बेजबाबदार पालकमंत्र्याविरूद्ध सोलापूरकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वैद्यकीय कचरा संकलन आणि त्यांवर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या बायोक्लिन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामात हलगर्जीपणा केला. यामुळे समस्त सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी कंपनीचा काळ्या यादीत समावेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड